Hesperian Health Guides

करोना विषाणू — कोविड-19


संबंधित लिंक्स

कोविड-19? म्हणजे काय?

कोविड-19 हा करोना व्हायरस/विषाणूमुळे होणारा एक आजार आहे, जो की एक सूक्ष्मजंतू आहे (इतका सूक्ष्म की सूक्ष्मदर्शकयंत्राशिवाय दिसूच शकत नाही) आणि लोकांमध्ये सहज पसरतो. कोविड-19 मुळे फ्लूसारखी लक्षणे उद्भवतात जसे की, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, ताप, अशक्तपणा आणि अंगदुखी. कोविड-19 मुख्यतः श्वसन संस्थेवर परिणाम करतो. जरी बहुतांशी संक्रमण हे धोकादायक नसले तरी यामुळे न्यूमोनिया (फुफ्फुसांचे एक गंभीर संक्रमण) होऊ शकतो आणि काही गंभीर रुग्णांमध्ये जीवितहानी देखील होऊ शकते.

करोना विषाणू कसा पसरतो ?

Corona color Page 1-1.png

करोना विषाणू आपल्या शरीरात तोंड, नाक,आणि डोळे यांमार्गांद्वारे प्रवेश करतो. जेव्हा एखादी संक्रमित व्यक्ती श्वास घेणे, खोकणे, किंवा शिंकणे या क्रिया आपल्यावर किंवा एखाद्या पृष्ठभागावर करतो आणि त्या भागाला आपण स्पर्श करतो व नंतर आपले डोळे, नाक किंवा तोंड यांना स्पर्श करतो अशा वेळी हा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतो. सर्वाधिक लोक संसर्गानंतर साधारणतः ५ दिवसांनी आजारी पडतात, परंतु आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वीही करोना विषाणू हा २ ते १४ दिवस शरीरात जीवंत राहू शकतो. आणि काही लोक, विशेषत: लहान मुलं बाधित होऊनही कधीही आजारी पडत नाही. अशाप्रकारे लोकं करोना विषाणू शरीरात असून त्याची जाणीव नसतांना, या विषाणूचा प्रसार इतरांना करू शकतात. करोना विषाणू काही पृष्ठभागांवर आणि वस्तूंवर कमीतकमी ३ दिवस आणि त्यापेक्षाही अधिक काळ जिवंत राहू शकतो. आणि संपर्काद्वारे हा सहज पसरतो.

करोना विषाणू कोणाला संक्रमित करतो?

करोना विषाणू चे संक्रमण कोणालाही होऊ शकते. इतकेच नव्हे तर जर आपल्याला संक्रमण झाले आणि आपण बरे झालो, तर ते आपल्याला पुन्हा होईल की नाही हे अद्याप माहिती नाही. ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या, विशेषतः प्रौढ व्यक्तींमध्ये, आणि ज्या लोकांना आधीच आजार आहेत, विशेषतः श्वसनासंबंधी विकार आणि रोगप्रतिकारकक्षमता कमी असलेल्यांना करोनाचा अधिक धोका आहे आणि त्यांना अधिक गंभीर परिणाम अनुभवास येऊ शकतात.

आपण संसर्ग होण्यास प्रतिबंध कसा करू शकतो?

सध्या करोना विषाणूसाठी कुठलीही लस किंवा विशिष्ट औषध नाही. प्रतिजैविक (antibiotics) किंवा घरगुती उपचारांनी करोना विषाणूचा नाश होत नाही. करोना विषाणूच्या संपर्कात येण्याचे टाळूनच त्यावर प्रतिबंध आणि वारंवार स्वच्छतेचे पालन करूनच त्याचा नायनाट करू शकतो.

  • आपले हात वारंवार साबणाने आणि पाण्याने धुवावे किंवा अल्कोहोल-आधारित हँड-रब (hand-rub) चा वापर करावा.
    • २० सेकंद पर्यंत साबण आणि पाण्याने हात चांगले धुवावे, शिवाय नखांच्या खालचा भाग आणि संपूर्ण पंजा, मनगट आणि हाताच्या कोपर्यापासून खालचा भाग खसखसून घासून धुवावे.
    • बाहेरून घरी परत आल्यावर, बाथरूम/संडासचा वापर केल्यावर, जेवणापूर्वी आणि खोकल्यानंतर, शिंकल्यानंतर किंवा नाक शिंकरल्यावर नेहमीच हात धुवावे.
    • हात न धुता आपल्या तोंडाला स्पर्श करू नये.
  • करोना विषाणू असण्याची शक्यता असलेले पृष्ठभाग (जसे की काउंटरचा वरचा भाग, दारांच्या कड्या इ.) अल्कोहोल किंवा ब्लीच सारख्या जंतुनाशक पदार्थांचा वापर करून स्वच्छ करावे:
    • अल्कोहोलः ७०% सांद्रता असलेले आइसोप्रोपिल अल्कोहोल (Isopropyl alcohol) करोना विषाणूचा त्वरित नाश करते. काउंटरचा वरचा भाग, दारांच्या कड्या आणि उपकरणे इत्यादींचे पृष्ठभाग साफ करण्यासाठी याचा वापर करावा. ६०% ते ७०% सांद्रता असलेले द्रावण सर्वात प्रभावी आहे; १००% सांद्रता असलेल्या द्रावणाचा वापर करू नका कारण जंतू नष्ट करण्यासाठी त्यात पाण्याची आवश्यकता असते. जर आपल्याकडे अल्कोहोल १०० % टक्के असेल, तर २ कप अल्कोहोल साठी १ कप पाणी या प्रमाणात घाला. प्रथम साबण आणि पाण्याने स्वच्छ करा, व नंतर अल्कोहोल द्रावणाने स्वच्छ करा आणि त्यास हवेमध्ये वाळू द्या.
    • ब्लीच: ब्लीच हे सहसा 5% द्रावणामध्ये येते. ते पातळ करण्यासाठी वा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी त्यात थंड पाणी घाला (गरम पाणी काम करणार नाही). फरशी/टाइल्स आणि मोठ्या पृष्ठभागांसाठी, ५ गॅलन बादली पाण्यामध्ये २ कप ब्लीच वापरा (२० लिटर पाण्यात ५०० मि.ली. ब्लीच). कमी प्रमाणात तयार करण्यासाठी, 4 कप पाण्यात 3 चमचे ब्लीच मिळवा (१ लिटर पाण्यात ५० मि.ली. ब्लीच). प्रथम साबण आणि पाण्याने स्वच्छ करा, नंतर ब्लीच द्रावणाने स्वच्छ करा आणि त्यास हवेमध्ये सुकू द्या.
  • वारंवार वापरण्यात येणार्या वस्तूंना जंतुनाशकाने स्वच्छ करा.
  • शक्य असल्यास कपडे, कपडाच्या साबणाने/डिटर्जंटने आणि गरम पाण्याने धुवा. आपल्या वॉशिंग मशीनमध्ये "प्री-रिन्स" असल्यास ते नक्की वापरा. जर आपण हातांनी कपडे धुत असाल तर साबणाचा भरपूर वापर करा आणि उन्हात कपडे वाळत घाला.
  • मास्क वापरुन स्वतःचे रक्षण करावे: जर आपण निरोगी असाल आणि एखाद्या करोना विषाणूच्या संसर्गाने ग्रस्त असलेल्या संदिग्ध आजारी व्यक्तीची काळजी घेत असाल तर सर्जिकल मास्कऐवेजी एन95 (N95)मास्क वापरा. एन95 मास्क हे सर्जिकल मास्कच्या तुलनेत उत्तम संरक्षण देते. मास्क व्यवस्थित वापरण्याकरिता:
    • आपले हात अल्कोहोल-आधारित हँड रब (hand rub) किंवा साबण आणि पाण्याने स्वच्छ करावे. मग आपले तोंड आणि नाक मास्कने झाकून घ्यावे, आपला चेहरा आणि मास्क यांच्यात काही अंतर किंवा फट तर नाही याची खात्री करुन घ्यावी.
    • मास्क घालतांना/परिधान करताना मास्कला स्पर्श करु नये आणि तो ओलसर झाल्यास नवीन मास्क वापरावा.
    • मास्क काढतांना तुमच्या डोक्याच्या मागील बाजूस असलेल्या मास्कच्या इलॅस्टिक पट्यांना धरून काढावा(मास्कला स्पर्श करू नये). तो मास्क त्वरित बंद डब्यात टाकून द्यावा आणि आपले हात स्वच्छ धुवावे.
    • मास्कचा पुन्हा-पुन्हा वापर करू नये. एन95(N95) मास्कचा पुन्हा वापर करायचा असल्यास, त्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ३० मिनिट १६० ° फॅ (७२ डिग्री सेल्सियस) ईतकी कोरडी उष्णता घ्यावी. किंवा, आपल्याकडे कमीतकमी ५ मास्क असल्यास, प्रत्येक मास्कला वेगवेगळ्या बॅगमध्ये ठेवावे आणि एका दिवशी एक मास्क या प्रमाणे पहिल्यांदा वापरलेला मास्क आपण प्रत्येक 5 दिवसांनंतर पुन्हा वापरावा.
    • आजारी व्यक्तिंसह काम करताना मास्क ऐवजी साधे कापड न वापरणे चांगले. कापड तुमच्या श्वसन क्रियेमुळे ओलसर होईल, आणि त्यामुळे बाहेरून संक्रमीत थेंब तुमच्यापर्यंत पोहचणे सुलभ होईल.
  • इतरांच्या संरक्षणासाठी मास्क घालावा: कारण एखादी व्यक्ती नकळतच संक्रमित असू शकते, म्हणून सार्वजनिक ठिकाणी एक साधा कापडाचा मास्क सर्वांनी बांधल्यास प्रत्येकजण इतरांना एकमेकांपासून संसर्ग होण्यापासून रोखू शकतात. लसीशिवाय, करोनाविषाणूचा प्रसार होण्यापासून थांबविणे हाच आपल्या समुदायाचे रक्षण करण्याचा एकमेव मार्ग आहे. तरीही आपल्याला आपले हात वारंवार धुण्याची आणि लोकांपासून २ मीटर (६ फूट) अंतर ठेवण्याची आवश्यकता आहे, कारण आपला मास्क आपले नाही तर आपल्या शेजार्यांचे रक्षण करतो.
  • आपल्या तब्येतीवर/आरोग्यावर लक्ष ठेवा. जर आपल्याला कोरडा खोकला, श्वास घेण्यात त्रास, छातीत दुखणे किंवा दबाव आणि ताप असेल, तर प्रथम आपल्या डॉक्टर किंवा स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यास कॉल करून उपचार कसे व कुठे मिळेल याविषयी विचारून घ्यावे. कारण कोविड -19 चा सर्वात गंभीर धोका म्हणजे श्वास घेण्यास असमर्थता (Acute Respiratory Distress Syndrome — ARDS), गंभीर रुग्णांवर उपचार करण्याकरिता ऑक्सिजन आणि एक यांत्रिक व्हेंटिलेटर (mechanical ventilator)ची आवश्यकता पडते, जे केवळ आरोग्य केंद्रातच उपलब्ध असते.

    • हे पृष्ठ सुधारित केले: ०५ जाने. २०२४